आंबोली ते आहुपे – आर्य अगस्ती

आंबोली ते आहुपे

२०१७ मधला माझा 'उडान' चा पहिला ट्रेक होता. या ट्रेकला जाण्याचे माझे पहिले कारण म्हणजे पाऊस. पावसामुळे आपल्याला त्या ठिकाणची सुंदर दृश्य पाहण्याचा अनुभव घेता येतो. जेव्हापासून मी 'गिरीप्रेमी' संस्थेत दाखल झालो, तेव्हापासूनचे सर्व पावसाळी ट्रेक मी केले आहेत.

२०१७ मधील उडानचा पहिला ट्रेक आंबोली ते आहुपे असा होता. हा ट्रेक मुक्कामी ट्रेक होता. या ट्रेकच्या तारखा १ व २ जुलै होत्या. १ जुलैला आम्हाला सकाळी ४ वाजता फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटपाशी पोचायचे होते.   साधारणतः आम्ही तेथून ४.३० - ४.४५ च्या दरम्यान निघालो व सकाळी ९ वाजता आंबोली गावात पोचलो. आंबोली गावात पोहोचल्या पोहोचल्या ढग गडगडू लागले व जोराचा पाऊस सुरु झाला. आम्ही सर्व उडानचे आहोत, त्यामुळे दादांनी आम्हाला मॅप दिले आणि रस्ता शोधायला लावला. आम्ही एका गावकऱ्याला विचारले. त्याने रस्ता बरोबर सांगितला पण त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला लावलं, कारण तिकडच्या नदीला पूर आला होता. पण आमच्याकडे तेवढा  वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही नदी व्यवस्थित पार केली आणि त्या गावकऱ्याचे रस्ता दाखवल्याबद्दल आभार मानले. नदी पार करण्याचा हा अनुभव उत्तम होता. नदी पार केल्यावर लगेचच आम्ही पायवाट शोधली व पायवाटेने पुढे पुढे जायला लागलो. पुढे जाता जाता आम्हाला अनेक नद्या पार कराव्या लागल्या. चार पाच तास चालल्यावर आम्ही ढाकेश्वरच्या मंदिरापाशी पोचलो. तिथे पोचल्यावर आम्हाला गरमागरम चहा पिण्याचे सुख  मिळाले. आणि तोसुद्धा गणेशदादाच्या हातचा. चहासोबत आम्ही ब्रेडसुद्धा खाल्ला, पोटभर नाश्ता केला व दुर्ग पाहायला निघालो.

दुर्गाच्या शिखरावरून आपल्याला पूर्ण कोकण विभाग बघण्यास मिळतो. पण जेव्हा आम्ही वर पोचलो तेव्हा इतकं धुकं होतं की आम्हाला आम्हीसुद्धा दिसत नव्हतो. त्यामुळे आम्हाला कोकणातील नजारा बघण्यास लाभले नाही. त्यानंतर आम्ही दुर्ग  उतरायला लागलो व निवासासाठी गाव शोधायला लागलो. जवळ जवळ दोन ते तीन तासांनी आम्हाला एक गाव मिळाले. त्यावेळी सुसाट वारं आणि कडाडून पाऊस पडत होता. त्यामुळे आम्ही त्या गावातील शाळेत थांबलो व तिथे आम्ही पुन्हा चहा करून प्यायलो. तेव्हड्यात भूषण दादा व गणेशदादाने जवळच्या एका घरी विचारपूस करून आमची खाण्यापिण्याची सोय केली. रात्री आम्ही त्या शाळेच्या जवळच्या घरात आमटीभात खाल्ला. त्या काकूंनी तो भात इतका सुंदर बनवला होता की त्याची चव आजही माझ्या जिभेवर आहे. रात्री झोपण्यासाठी आम्हाला त्या शाळेचे कार्यालय देण्यात आले. बऱ्यापैकी ते स्वच्छ व चांगले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही उठल्यावर आम्ही परत त्यांच्याकडे उरलेला भात फोडणीचा भात करून खाल्ला व चहासुद्धा प्यायलो. त्यांचे आभार मानून त्यांचा निरोप घेतला. व यानंतर पायी प्रवास खूप खडतर नव्हता. त्यामुळे आम्ही तो प्रवास पटकन पार केला व आहुपे गावात पोचलो.

साधारणतः हा ट्रेक ३५ ते ४० किमीचा होता. आहुपेवरून आम्ही १ वाजून ५ मिनिटांनी निघालो आणि पोटात उडणाऱ्या कावळ्यांना जरा गप्प बसवलं व मंचर या  गावात येऊन हॉटेलच्या जेवणावर ताव मारला. सुमारे ६. ४५ रस ७.०० च्या दरम्यान आम्ही पुण्याला पोचलो. हा ट्रेक अतिशय सुंदर होता. निसर्गाचे जेवढे  वर्णन करू तेवढे कमीच, एवढा सुंदर निसर्ग होता. हा ट्रेक काढल्याबद्दल GGIM च्या दादांना धन्यवाद.

आर्य अगस्ती

सी/ २३, गंधर्व नगरी,  १० वी गल्ली,

डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे - २९

फोन - ०२०- २५३९५३७५

 

Contact Person WhatsApp us