Experiences from Everest Base Camp

Everest Base Camp

Mr. Nilesh Deshpande, pens his heartfelt feelings as he treks from Lukla to the EBC.

 एवरेस्ट दर्शन

गेल्या सहा महिन्यांत मागे वाजणाऱ्या तानपुऱ्यासारखा जो विचार मनात सत्तत गुंजत होता, जे स्वप्न कित्येक दिवस जगत होतो त्याच्या पूर्णाहुतीची वेळ. खर तर खूप उत्साहात चालायला लागावं अशी माझीच माझ्याकडून माफक अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे सुरवातीचा जोर मारला देखील.

गणपती बाप्पा मोरया चा गजर निनादला. रोजच्या सरावाने शेर्पा मंडळी देखील आपला मोरया आमच्या गजरात मिसळून दीला. सर्व रस्ता बर्फानी झाकला गेला होता. थंडी तर भलतीच होती कि काय सांगू. खुंबू ग्लेशिअर ला समांतर चाल सुरु झाली. साधारण तासाभरात सुर्य किरण सारा आसमंत उजळू लागले आणि थोडी उब देऊ लागले. थोडके पुढे गेल्यावर उजवीकडे दोन शिखरांच्या मध्ये एव्हरेस्टचं दर्शन झालं. पासंगशी खात्री करून घेतली हेच एव्हरेस्ट. खालच्या दगडाची तमा न बाळगता गुढगे टेकले आणि त्या खडकाळ जमिनीवर डोकं टेकवलं. नजरेत येणाऱ्या टप्प्यात कुठलीहि मानवी अस्तित्वची चाहूल नव्हती. सारे सोबती एकतर पुढचे चढ उतार जवळ करत होते किंवा मागे विश्रांती साठी टेकले होते. निखळ एकांत. फक्त त्या निसर्गाच्या रौद्रभीषण अशा सृजनातला, सर्वात नगण्य किंवा क:पदार्थ मी आणि निसर्गाचा पृथ्वीवरचा सर्वात मोठा अविष्कार सगरमाथा. त्याला मानवंदना दिल्याशिवाय पुढ निघणे अशक्यच होत. अचानक इतक्या पहाटे धुकं दाटून आलं. पाऊस येणार असं वाटतानाच पाऊसाने घेरलं. आता पोन्चो काढणे आले. पण पाऊस माझ्या पुरताच होता. दोन्ही गाल ओले करण्या आधी पाऊस सन ग्लासेस मधून बाहेर पडत होता. बर्फाळ शिखरं नुसत्या डोळ्यांनी पाहू नयेत. या सूचनेची तमा न बाळगता काळा चष्मा काढला आणि डोळे भरून एव्हरेस्टला पहिले.

 आिण अजुन एक दगड तरला

आता चाल एका चिंचोळ्या वाटेने दोन्ही बाजवांच्या दऱ्यांमधून होती. उजवीकडे प्रचंड हे विशेषण लहान वाटावे अशी खुंबू ग्लेशिअर आणि वरती आकाशात घुसलेला तो स्वर्गमाथा. एकेक पाऊल जिंकत पुढे जात होतो. जिंकत हाच खरा शब्द. प्रत्येक पाऊल धाप लगावणार त्यांत चढ आणि उतार. आणि अचानक पाय थांबले. मला बसायचय. त्यांत काही नवीन नाही. थोडकं चालून झाले कि टेकायचं हे नियमानुसारचं. पण हे वेगळ आहे. पाय दुखत नाहीयेत. खांदे जडावले नाहीयेत. श्वास नियंत्रित आहे. तहान सुद्धा नाहीये. डोकं गरगरत किंवा दुखत नाहीये. पण आज मनाने बंड केलंय. मेंदू पायांना चालायचा आदेशच देत नाहीये. ट्रेकिंग पोल टाकून दिलाय, पाण्याची बाटली पण नकोय. जणू काही त्या सगरमाथ्याने सर्व प्राण सोकून घेतलेत. चाचरत चाचरत मी ट्रेक रूट वर पाय घातलाय आणि समोर त्या अतिभव्य पृथ्वीच्या अत्युच्च बिंदुला पाहून ठकची मी ठेला झालोय आता काय करु. माझ मन त्याने बोधून घेतलं आहे. नको काही. नको पुढे जाण, नको फोटो आणि नको ती स्वप्नपूर्ती. आपलं अस्तित्वच मुळात इतकं नगण्य आहे त्यात या स्वप्नांची काय किंमत?

इतक्यात कुणी पाठीवर हात ठेवलाय. "सर, थोडं खा आणि पाणी प्या, आपल्याला ईबीसी पत्थर गाठायचाय. मी कुणाला ती अचीवमेंट चुकवू देणार नाही." अजून मी पूर्ण भानावर नाही. दिनेश नकोरे पुरे आता खूप झालं. दिनेश ट्रेकिंग पोल हातात देवून उठवतोय. पाण्याची बाटली उघडून देतोय. काहीतरी खायचं हातात कोंबतोय आणि नेहमी सारखं खोट बोलतोय अगदी थोडं राहिलंय. ये दिन्या फेकू नकोस उगाच, खूप चालायचे आहे अजून, माहिती आहे मला. गेल्या दहा दिवसातली चिडचिड सगळे बंध तोडून दिनेशवर जातेय. एखाद्या डॉक्टरच्या शांतपणे तो ती "रुग्णाची" तणतण दिनेश सहन करतोय. सर, इतकं केलत आता अगदी थोडचं सहन करा स्वतःला पुश करा बेस कॅम्प हाकेच्या अंतरावर आहे.

हळू हळू जाणीवा जागेवर येताहेत. दिनेशच्या खांद्यावर हात ठेवलाय खर तर त्याला सॉरी म्हणायचय. दिनेश खांद्यावरचा हात थोपटत पुन्हा तेच म्हणतोय चला सर. पण पाऊल उचलत नाहीये. आपण कोण, आपली समाजात पत काय, आर्थिक स्थान काय, आपला हुद्धा काय, किती लोकांवर आपली सत्ता आणि अस असून हे हाल. एव्हरेस्ट शिखरमाथ्यावरचा प्रचंड वारा कसा सार काही एका क्षणांत उडवून देतो. तद्वत हे सारे मूल्याधिष्टित विचार निमिषांत उडून गेले. यातली एकही गोष्ट मला त्यावेळी स्वतःच्या पायावर उभे करू शकली नहि.

अप्पांची जन्मशताब्दी चा संकल्प, माझ्या ऑफिस मधल्या साऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा, अनेकानेक थोरामोठ्यांचे आशीर्वाद काही पाऊल पुढे घेवून गेली. अर्णव-अनन्याची बडबड काही पावलं सोपी करत होती. आईबाबांची मुक काळजी काही मीटर रस्ता जवळ आणत होती. विनयचा पूर्ण विश्वास होऊन जाईल रे काही धोंडे पार करवत होती. प्राची आणि आर्याचे फोटो काही अंतर तोडायचं कारण ठरले. फोनला रेंजचं मिळत नव्हती नाहीतर प्राचीचं बोलण नक्की पुढे घेवून गेलं असतं. पहिली हाफ मॅरेथॉनचा शेवटचा टप्पा प्राचीशी बोलतच काटला होता. पण आज तो उपाय पण नव्हता. सगळ्यात शेवटी पाऊलांना बळ दिलं ते गुरुदेवांच्या प्रार्थनेने आणि रामनामाने. श्री राम जय राम जय जय राम. आज पुन्हा एकदा रामनामाने एक दगड तरला.

 पुर्णाहुती

दिनेश या सगळ्याचं निमित्त. पहिल्या टीम बरोबर बेस कॅम्प करून तो आला होता. तरी गेल्या सात दिवसांत कुठेही निवांत तो बसला नव्हता. गेले चार दिवस तो विवान आणि विहानच्या विवंचनेत कधी त्यांची सॅक घेवून, तर कधी त्यांना घेवून चालत होता. सगळी मागची बाजू दिनेशने एकहाती सांभाळली होती. तो आज आम्हाला अस काही बेस कॅम्पला नेत होता जणू काही आम्ही एवेहरेस्ट बेस कॅम्पला आमच जाण हे आम्ही त्याच्यावर उपकारच करत होतो. आम्हा सगळ्यांचे समिट व्हावं याची सगळ्यांत जास्त तळमळ दिनेशला होती. त्यासाठी संपूर्ण ट्रेकरूट वर अनेक गोष्टी तो आमच्या कडून करून घेत होता. स्वतःचा थकवा, थंडी, विरळ हवामान, प्रसंगी जेवण याची तमा न बाळगता. दिन्या आमचं समिट तुझंच रे.

आणि पिवळे निळे तंबू दिसू लागले. अगदी स्पष्ट. कॅम्प मधली हालचाल पण दिसू लागली. प्रार्थना पताकांची (प्रेयर फ्लॅग) फडफड जाणवू लागली. चालत उजवीकडे वळलो पुमोरीला पाठी ठेवून एक चढ चढला आणि मी एव्हरेस्ट बेस कॅम्प मध्ये होतो.

आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पला आहोत या वास्तवावर विश्वासच बसत नव्हता. समोर इबीसीचा पत्थर होता, EVEREST BASE CAMP २०१६ असं लिहिलेला. रंगबीरंगी पताका फडकत होत्या. अनुप, गोपाळ, महेशला कडकडून मिठी मारली. डोळ्यातल पाणी लपवण्याचा शिष्टाचार देखील तेंव्हा करावासा वाटला नहि. ईबीसी पत्थरला हात लावला. एखाद्या मूर्तीला अभिषेक घालताना त्यावर हात फिरवतात, तसा हात त्या दगडावर फिरवला. वेगळीच अनुभूती होती ती, तो दागडाचा देव होता. शिवछत्रपतींची देखील एक मूर्ती तिथे होती. त्या दैवताच्या पायाशी बसलो, विसावलो. सगळी गात्र निवली होती. डोक्यातला सारा कोलाहल शांत होत होता. प्राचीची खूप आठवण आली पण बोलावसच वाटत नव्हत. त्यातीथे मुक्तीचं मिळाली होती मला. इतक्या दिवसाचा अट्टहास पूर्ण झाला होत. अनेकांच्या शुभेच्छा, सर्व मित्रांची काळजी. आई बाबा अत्त्त्याचा आशीर्वाद. विनयचा विश्वास. प्राचीची आणि आर्याची संपूर्ण साथ. आणि गेल्या दहा दिवसाचे सगळ्या ट्रेकमित्रांबरोबर घालवलेले लक्षावधी क्षण आठवत होते. आकाशी बघून अप्पांना ( गो नी दांडेकरांना ) त्यांच्या जन्मशताब्दीच माझं अर्घ्य दिलं. आता उरले होते ते एकच दैवत माझे शिवस्वरूप गुरुदेव.

गुरुदेव काय म्हणू. तुमचा संकल्प तुम्हीच पूर्ण केलात. अजुन काय म्हणू. त्या एव्हरेस्ट बेस कॅम्प पत्थरला डोकं टेकून डोळे बंद केलं. सार काही शांत होत होतं.

अचानक डोळ्यातून पाणी आलं. डोळे उघडले त्यावेळी विमान मुंबईच्या विमानतळावर विसावत होत. एक समृद्ध करणारा अनुभव घेऊन अनेक जिवलग जोडून मी मझ्या विश्वांत उतरत होतो. सारा भवताल तोच होता पण त्यातला मी बहुतेक बदललो होतो इवलासा का होइना पण मी बदललो होतो एव्हरेस्ट बेस कॅम्पचा प्रत्यक्ष स्पर्श आणि सगरमात्याच्या नेत्र स्पर्शाने.

Call Now ButtonCall Now
WhatsApp WhatsApp us