मुलांमधे होणारे सुखद बदल अनुभवत आहोत
माझा मुलगा वेदात्मन गेले तीन वर्षांपासून गार्डियन-गिरिप्रेमीच्या आव्हान-निर्माण-उडान कार्यक्रमातील प्रत्येक ट्रेकमधे वेगवेगळे अनुभव गाठीशी घेत, नवनवीन कौशल्ये शिकत, गिरिप्रेमी कुटंबातील सदस्यांबरोबरच्या मैत्रीने समृद्ध होत, आनंदासाठी गिर्यारोहण करत मोठा होतो आहे. इथे येणापूर्वीचा वेदात्मन आणि आत्ता निर्माणच्या कंपूबरोबर HMI base camp चा ट्रेक करून आलेला वेदात्मन यातला विलक्षण बदल जाणवण्याजोगा आहे.
तीन वर्षांपूर्वी तो त्याच्या वर्गमित्रांबरोबर गिरिप्रेमीच्या ’आव्हान’ मधे आला. खरंतर अगदी वर्षाचाही नव्हता तेव्हापासून तो आमच्याबरोबर डोंगरद-या फिरतो आहे. पण स्वभावाने तो जरासा बुजरा, पटकन कोणात न मिसळणारा, स्वतःत रमणारा असा आहे. अगदी जवळच्या मित्रांच्याही घरी वगैरे राहायला जायला त्याला फारसं आवडायचं नाही. त्यात त्याला लहानपणापासून थोडासा दम्याचा त्रासही होता. अशा सगळ्या कारणांमुळे त्याला बाहेरच्या कोणत्या ग्रूपबरोबर आम्ही कधी ट्रेकसाठी पाठवायचा विचार केला नाही. कधी तशी संधी आली तर तो तयारही नसायचा. ’आव्हान’मधे तो आला तेव्हाही तो इथे कितपत रमेल अशी थोडीशी शंका मनात होतीच, पण त्याचे नेहमीचे वर्गातले मित्र त्याच्याबरोबर आव्हानमधे होते ही त्याच्यासाठी जरा दिलासा देणारी बाब असावी. त्यामुळे कधी नव्हे ते तो घरच्या लोकांना सोडून ट्रेकला जायला तयार झाला. प्रत्येक ट्रेकनंतर घरी आल्यावर त्याचा फुललेला चेहरा, उत्साहाने दिवसभराच्या गमतीजमती सांगणं, तिथे कायकाय शिकलो त्याचे घरी प्रयोग, पुढच्या ट्रेकला जाण्याची वाट बघणं यातून त्याला हे आवडतंय याची पावती मिळत गेली. गिरिप्रेमी परिवाराच्या सहवासात तो अधिकाधिक मोकळा, स्वयंपूर्ण, धीट होत गेला.
गिरिप्रेमी परिवारातली एक छान गोष्ट म्हणजे ट्रेकबरोबर येणा-या ताई-दादांबरोबर या सगळ्या मुलांचं असलेलं जिव्हाळ्याचं नातं. खरंतर गिर्यारोहण क्षेत्रातले अतिशय अनुभवी ताई-दादा या मुलांबरोबर प्रशिक्षक-मार्गदर्शक म्हणून असतात, पण ही मुलं अगदी बरोबरीच्या नात्यानं त्यांच्याबरोबर दंगामस्ती, चेष्टामस्करी करत असतात. मुक्कामी ट्रेकमधे, मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर सगळ्या दादांकडून त्यांच्या मोहिमांच्या गोष्टी आणि आठवणी ऐकणं ही या मुलांसाठी एक ’भारी’ गोष्ट असते. ट्रेकची मजा घेणं, आणि त्याचवेळी जबाबदारीनं वागणं, निसर्गाच्या संकेतांचा आदर करणं, पर्यावरण संवर्धनाचं भान, स्पर्धा न करता सर्वांना घेऊन पुढे जाणं अशा कितीतरी गोष्टी मुलं दादा-ताईंबरोबर राहून, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आत्मसात करत आहेत. काही ट्रेकना तर उषाताईही मुलांबरोबर होत्या. असे कसलेले मार्गदर्शक बरोबर असण्याचं महत्व फार मोठं आहे.
बियास कुंडच्या वेळी डोळे पुसत पुसत निरोप देणारी मुलं नंतर फोनवर ’आई आम्ही शेवटच्या टप्प्यात मस्तपैकी बर्फ़ात खेळलो’ असं उत्तेजित स्वरात सांगतात; पिंडारीच्या ट्रेकला जाताना प्रयत्नपूर्वक चेहरा हसरा ठेवून- नंतर रेल्वेत रडून घेणारी मुलं ट्रेकहून परतल्यावर ’बाबा, आता आम्ही फ़ोर थाऊजंडर्स झालो’ असं एव्हरेस्ट जिंकल्याच्या थाटात सांगतात; हे सगळं अनुभवणं फार मजेचं आहे.
HMI च्या Adventure Camp ला जाताना ही मुलं अधिक जबाबदार झाल्याचं जाणवलं. हिमालयन पर्वतारोहण संस्थेचा हा कार्यक्रम सोळा वर्ष पूर्ण केलेल्या मुलांसाठी असल्याने या मुलांसाठी तो चांगलाच आव्हानात्मक होता. ट्रेकच्या महिनाभर आधीपासून दादांनी करून घेतलेल्या तयारीमुळे, मुलं मात्र शारिरीकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही हे आव्हान पेलण्यासाठी तयार झालेली होती. एक मोठाच टप्पा पार केल्याने आणि हिमालयन पर्वतारोहण संस्थेच्या पदाधिका-यांनीही कौतुक केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे आणि ती ’उडान’साठी सज्ज झालेली आहेत.
आव्हान-निर्माण-उडान कार्यक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे आणि गार्डियन-गिरिप्रेमीचा चमू तितक्याच तयारीने आणि यशस्वीपणे त्याला सामोरा जातो आहे. विचारपूर्वक आखलेल्या कार्यक्रमातून फक्त गिर्यारोहणाचा खेळच नव्हे, तर गिरिप्रेमीची संस्कृतीही मुलांमधे रुजवतो आहे.
आपलं मूल गिरीप्रेमी परिवाराचा एक भाग आहे ही आमच्यासाठी खूप आनंदाची आणि मोलाची गोष्ट आहे. गिरीप्रेमी परिवाराला यापुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
अश्विनी केळकर, पुणे