Site Loader

Insights in Diploma in Mountaineering by Dr. Guruprasad Kulkarni

नव्या विश्वातील नव्या वाटा...

देवानं मनुष्याला काही वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बदल दिलेत, ज्यामुळे तो इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच पैकी एक म्हणजे, पाठीचा ताठ कणा आणि दोन पाय, जे आपल्याला सहज आणि सतत पुढे पुढे जाण्याची प्रेरणा देतात. मी सुद्धा थोडीशी धाडसी वृत्ती अंगी असल्याने आता काहीतरी वेगळं करावं या विचारात असतानाच, २०२१ मध्ये गिर्यारोहणातील डिप्लोमा माझ्या समोर आला, संपूर्ण एक वर्षाचा घवघवीत असा अभ्यासक्रम जो भारतातील पहिलाच, ज्याची संरचना पुण्यातील गिर्यारोहणातील अग्रगण्य गिरिप्रेमी संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मौंटेनीरींग, उत्तरकाशी यांनी एकत्र येऊन केलेली, अशी त्याची ओळख. आज पावेतो सह्याद्रीच्या विविध दऱ्या खोऱ्यात, दुर्गांवर, घाटवाटांवर पडणारी ही पावलं आपोआप आता तंत्रशुद्ध गिर्यारोहणाकडे कशी वळली, कळलं सुद्धा नाही. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक अभ्यास करावा लागला, अभ्यासाचं वय कधीच संपत नसतं, या उलट नवं शिकायला मिळणार या विचारानेच तयारी केली आणि मोजक्याच ४० मध्ये स्थान मिळवायचं हे जणू ध्येयच बनलं, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन DMAS मध्ये प्रवेश मिळाला, खूप खूप मनापासून आनंद झाला. 

कोरोना काळात घर बसल्या, ऑफिस आणि दवाखाना सांभाळून संध्याकाळी कोर्सचे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू झाले, अतिशय उत्कृष्ट नियोजन, विषय आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्याती असलेले प्रशिक्षक यामुळं या संधीचं सोनं करायचं हेच डोक्यात असायचं. विषय नवीन होता त्यामुळं शंकाही भरपूर होत्या आणि तितकंच समाधानी निरसन सुद्धा वेळोवेळी झालं, त्यामुळं यात आनंद मिळू लागला. पहिल्या सत्राच्या समाप्तीपूर्वी, आजपर्यंत आभासी पाहिलेले चेहरे सिंहगडावर १० दिवसांच्या विविध क्लाइंबिंग प्रशिक्षणासाठी एकत्र आले, तिथं एक वेगळं बाँडींग झालं. वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ काही तरुण तर काही पन्नाशीतले असा छान मिलाफ होता. हिमालयातील विविध अष्टहजारी शिखरांवर यशस्वी मोहीम करणारे, काळजात धस्स करणाऱ्या सह्याद्रीतील विविध कातळ कड्यांवर आरोहण करणारे असे अत्यंत अनुभवी प्रशिक्षक आम्हाला लाभले आणि यांना दिशा देणारे मार्गदर्शक म्हणजे श्री. उमेश झिरपे, अर्थात मामा यांची भेट हे सगळंच जणू अकल्पनीय असं होतं. मन आणि उर अभिमानाने भरून यायचं, त्यांच्या हातात आपण सुरक्षित आहोत याचा पक्का विश्वास झाला आणि बेसिक रॉक क्लाइंबिंग प्रशिक्षण पूर्ण करून आम्ही घरी परतलो, खूप काही शिकलो आणि पुढे ओढ लागली ती दुसऱ्या सत्रातील हिमालयातील प्रशिक्षणाची.

मार्च २०२२ मध्ये २४ दिवसांच्या हिमालयातील विशेष प्रशिक्षणासाठी आम्ही उत्तरकाशी NIM येथे गेलो, ज्यात आमचा BMC ( बेसिक मौंटेनीरींग कोर्स )सुद्धा पूर्ण झाला. हिमालय हा सह्याद्रीपेक्षा वेगळा आहे, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, हवेची स्थिती फार वेगळी आहे, पण खडतर प्रशिक्षण पूर्ण झालं आणि यात पुढं अजून शिक्षण घेण्याची उमेद निर्माण झाली. 

या सगळ्या वर्षभराच्या कालावधीत खूप लहान मोठे अनुभव मिळाले, पुढील वाटचालीची दिशा मिळाली, विविध रंगी निसर्ग अनुभवायला, त्याच्या जवळ जायला मिळालं. डोंगर दऱ्यातील चढाई उतराई तसेच गिर्यारोहण यात वापरली जाणारी शब्दावली फार वैशिषटयपूर्ण  आणि अर्थपूर्ण आहे, जी आपोआप आता आमची हमसफर झालीय. नवे मित्र दिले या डिप्लोमा कोर्सने, आपल्या जोडीदारावर संपूर्ण विश्वास ठेऊन आपल्या जीवाचा दोर त्याच्या हाती द्यायची हिम्मत दिली. संपूर्ण सेफ्टी, संपूर्ण एकाग्रता, संपूर्ण मानसिक व शारीरिक समतोल कसा राखावा याचे धडे DMAS मध्येच मिळाले. आयुर्वेदाचा डॉक्टर असल्याने “अभ्यासं सततं क्रिया”  ही उक्ती सार्थ असल्याचा विलक्षण अनुभव आणि आनंद मिळाला.

हे सर्व प्रशिक्षण पूर्ण करून आता एक समविचारी होऊ घातलेल्या गिर्यारोहकांचा संघ झालाय आणि घेतलेले धडे गिरवले जाऊ लागलेत ते सह्याद्रीत कातळ कडे सुळके आरोहण करून. नुकतेच आम्ही लोणावळा जवळील तैल बैला आणि खिरेश्वर जवळील सांगनोरे पिन्याकल यशस्वी पणे सर केले, पुढेही बऱ्याच मोहिमा आखल्या आहेत, ज्यातून माझ्यासाठी नव्या असलेल्या या विश्वातील नव्या वाटा शोधत “आनंदासाठी गिर्यारोहण” करायचं आहे.

                   

डॉ. गुरुप्रसाद प्र. कुलकर्णी

एम्. डी. ( आयुर्वेद )

तळेगांव दाभाडे, पुणे.

९१४६९६९८२६

Admissions Open! Diploma in Mountaineering & Allied Sports
2022-23

Online applications are invited from all eligible candidates for admission to various Diploma Cou rses offered by the University Departments/Centres/Schools. Please see the details and the circular in the Diploma Course in Mountaineering Section for the important announcements