Site Loader

बिनभिंतींची उघडी शाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गार्डीयन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगच्या एक वर्षाच्या डिप्लोमा इन माउंटनियरिंग कोर्सचे आम्ही ४१ विद्यार्थी उत्तरकाशी मधील भंडारी हॉटेल जवळ बसची वाट पाहत थांबलो होतो. निमित्त होते गढवाल हिमालयातील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग (NIM) च्या बेसिक माउंटनियरिंग कोर्सचे . यापुढे निम (NIM) म्हणजे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग असे गृहीत धरूया. निम मध्ये २४ दिवसांचे हे निवासी प्रशिक्षण असणार होते. आम्हा विद्यार्थ्यां मध्ये डॉक्टर, इंजिनिअर,वकील, गिर्यारोहक, हवामानतज्ञ,पत्रकार,विद्यार्थी अशी विविधता होती. तंत्र वापरून खडकांवर,स्नो वर आणि बर्फावर चढण्याचे ; तसेच जास्त काळासाठी अति उंचीवर राहण्यासाठीचे प्रशिक्षण आम्हाला या कोर्समध्ये मिळणार होते. ‘निम’ची बस आली आणि सर्वांच्या बॅगा टपावर टाकून पाईन वृक्षांच्या लदारी जंगलाने वेढलेल्या नेहरू इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही दाखल झालो. पहिला दिवस निवांत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला इन्स्टिट्यूट मधून गावात जाणाऱ्या वळणा वळणांच्या रस्त्याने जॉगिंग करत नेण्यात आले. कठोर शारीरिक प्रशिक्षण हा या प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग होता. इथे येण्याआधीही सहा महिन्यांपासून आम्ही रोज सूर्यनमस्कार, योगा, ताकदीचे व्यायाम, आठवडयातुन दोनदा २० किलो वजन पाठीवर घेऊन सिंहगड चढणे, महिन्यातून दोन वेळा कात्रज ते सिंहगड ट्रेक किंवा सिंहगड ते राजगड ते तोरणा असा ५० किलोमीटरचा ट्रेक अशी या प्रशिक्षणासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक तयारी करत होतो. या तयारीचा फायदा आता जाणवत होता. जॉगिंग करून इन्स्टिट्यूटला परत आल्यावर आमचे  १०-१० जणांच्या ४ रोपमध्ये म्हणजेच गटांमध्ये विभाजन करण्यात आले. प्रत्येक रोपला एक  प्रशिक्षक नेमण्यात आला. त्याच दुपारी आम्हाला पुढील २४ दिवसात वापरायच्या साधन सामुग्रीचे वाटप करण्यात आले. या साधन सामुग्रीत स्लीपिंग बॅग, स्लीपिंग मॅट, मेस्टीन म्हणजे खास गिर्यारोहकांसाठी बनवलेले जेवणासाठीचे डबे, कप,पाण्याची बाटली, स्नो बूट, ते बूट बर्फात रुतन्यासाठीचे लोखंडी क्रॅम्पोन, विंड प्रूफ जॅकेट, अति थंडीसाठीचे फिदर जॅकेट, आईस एक्स,हेल्मेट, पॉंचो, रोप, रॉक क्लायंबिंग शूज, कचरा साठवण्यासाठी छोटी पिशवी, चढाईसाठी लागणारी इतर तांत्रिक उपकरणे याचे वाटप करण्यात आले. हे सगळे ठेवण्यासाठी एक मोठी रकसॅकही देण्यात आली.  पुढे २४ दिवस लागणारं सर्व सामान या एका बॅगमध्ये आणि ती बॅग आमच्या पाठीवर असणार होती. पर्वतांमध्ये रकसॅकच आपला सुख दुःखातला साथीदार असते अशी एक म्हणच गिर्यारोहणाच्या दुनियेत म्हटली जाते. या म्हणीचा प्रत्यय आम्हालाही आलाच. पुढे आम्हाला आरोहण करताना उपयोगात येणाऱ्या वेगवेगळ्या गाठी, दोराचे प्रकार, साधनांचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आले. संध्याकाळी टेंट लावण्याच्या कौशल्याचा वर्ग सुरू होता आणि अचानक आमच्यातला प्रशांत, जो आमच्यातला One of the fittest मेम्बर होता तो अचानक बेशुद्ध होऊन पडला आणि सगळ्यांचीच धावाधाव झाली.  हा फिटचा प्रकार असल्याचे सांगून प्रशांतला पुढील धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण नाकारण्यात आले. झाल्या घटनेने सगळ्यांचीच धास्ती थोडी वाढली होती.
पण Show Must Go On ! !
उद्यापासून आमची प्रात्यक्षिके सुरू होणार होती. दिलेले सर्व सामान बॅगपॅकिंगच्या वर्गात शिकवल्याप्रमाणे भरून वजनदार झालेल्या रकसॅक आमच्या मानगुटीवर बसण्यासाठी तयार होत्या. पुढचे काही दिवस आमची कर्मभूमी असणार होती टेखला.

टेखला रॉक क्लायंबिंग एरिया

टेखला म्हणजे रॉक क्लायंबर्सची पंढरीच. पुढचे ६ दिवस आमची वारी रोज सकाळी ६ वाजता इन्स्टिट्यूटपासून ११ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टेखलाला भागीरथी नदीच्या काठाकाठाने चालत निघायची. अति उंचीवरील प्रशिक्षणासाठीची तयारी म्हणून आम्हाला पूर्ण भरलेली रकसॅक पाठीवर वाहून न्यायची होती. या रकसॅकचे वजन २२ किलोच्या जवळपास झाले होते. टेखलाला पोहचून रकसॅक खांद्यावरून उतरवली की जणू आपण हवेत उडतोय असंच वाटायचं. टेखला इथे आम्हाला बोल्डरिंग – म्हणजे १०-१५ फुटांच्या खडकांवर कोणत्याही साधनांशिवाय चढाई करणं शिकवलं गेलं. त्यानंतर ५० ते ९० फुटांच्या दगडी भिंतीवर रोप, कॅरॅबिनर, चोकनट, फ्रेन्डझ, डिसेंडर आणि इतर तंत्राच्या साहाय्याने चढाई करणं, तसेच त्या उंच खडकाच्या भिंतीवरून दोराच्या साहाय्याने
उतरणं म्हणजेच रॅपलिंग, दोन कपारीमध्ये असलेल्या फटीतून वर चढणं – उतरणं, हे सर्व प्रात्याक्षिकांसाहित शिकवलं गेलं. जेवणानंतरच्या छोट्या ब्रेक मध्ये कोणी पुस्तकं वाचत,कोणी रोजनिशी लिहित, कोणी गाणी म्हणत तर कोणी नुसतं हिमालयाच्या सावलीत बसून चहूबाजूच्या उंचच उंच पर्वतांकडे बघत बसायचं. दुपारनंतरच्या सेशन मध्ये रॉक टर्मिनोलॉजी, पर्वतांवरील हवामान, हिमालयाची निर्मिती आणि इतिहास, शेर्पा समुदायाचा इतिहास, अतिउंचीवरील आजार, हवामान, ढगांचे प्रकार इत्यादी विषयांचे थेरी वर्गही झाले. फावल्या वेळात वाचन करण्यासाठी अतिशय सुसज्ज ग्रंथालयही होतं. अतिउंचीच्या प्रशिक्षणासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक तयारी या काळात करून घेतली जात होती. यामध्ये एक दिवस इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या आर्टिफिशियल भिंतीवरील चढाई देखील शिकवली गेली.

नकाशा वाचन

गिर्यारोहणामध्ये नकाशा वाचता येणं खूप गरजेचं आहे. ऐनवेळी तुम्हाला नकाशा वाचता आला नाही तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते. दिलेल्या अक्षांश रेखांशा वरून इप्सित स्थळी पोहचणे, आपण जिथे उभे आहोत त्या जागेचे अक्षांश रेखांश शोधणे, आपल्याला जिथं पोहोचायचं आहे त्या स्थळाची दिशानिश्चिती ही कौशल्ये नकाशा वाचनाच्या वर्गात आम्हाला शिकवली गेली . ही कौशल्ये न आल्यास पर्वतांमध्ये आपण चुकीच्या दिशेने भरकटू शकतो. आता विचार करताना असं भरकटणं कदाचित थ्रिल वाटू शकेल पण पर्वतांमध्ये ते अजिबात परवडणारे नसते.
नकाशा वाचनाच्या थेरी वर्गानंतर प्रात्यक्षिकासाठी चार अक्षांश रेखांशांचे पॉईंट्स आणि गढवाल हिमालयाचा नकाशा आम्हाला देण्यात आला. त्या चार पॉईंट्स वर उभ्या असलेल्या माणसांची सही ठराविक वेळेत आम्हाला घेऊन यायची होती.. अनेक डोंगरवाटा,कपारी मध्ये असलेले हे पॉईंट्स चार वेगवेगळ्या दिशांचे होते. फक्त नकाशा वाचून ते शोधायचे होते. ते शोधण्यासाठीचा प्रवास जवळपास 8 किलोमीटरचा होता. हे गटात करायचे होते. या प्रशिक्षणाचा प्रवास जसा गिर्यारोहण शिकण्याचा होता तसा एकमेकांचे स्वभाव जाणून घेत, एकमेकांना मदत करत, कधी एकमेकांवर नाराज होत, भांडणं करत आणि ती मिटवून सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आणि माणसं वाचण्याचाही होता.

अतिउंचीवरील प्रशिक्षण
(High Altitude Training)

अतिउंचीवरील प्रशिक्षणाचा बेस कॅम्प १३२०० फूट उंचीवर होता. इन्स्टिट्यूट ते बेस कॅम्प हा चार दिवसांचा प्रवास असणार होता. आमचा पहिला मुक्काम असणार होता ८००० फुटांवर असलेला तेल कॅम्प. कोर्सच्या दहाव्या दिवशी आम्ही सकाळी ६ वाजता अतिउंचीवरील प्रशिक्षणासाठी बसवर बॅगा टाकून उत्तरकाशी ते गंगोत्री रस्त्याच्या दिशेने निघालो. भुकी गावाच्या पायथापर्यंत बस आणि पुढे पूर्ण चालत प्रवास असणार होता. कधीही पाठ न सोडणाऱ्या २२-२५ किलो वजनी रकसॅक पाठीवर होत्याच. पाठीवर हे वजन घेऊन चालणे हा खरोखर या प्रशिक्षणातील अवघड आणि महत्वाचा भाग होता.

इथून पुढं १० दिवस आमच्या मोबाईलला रेंजही नसणार होती.
भुकी रोड हुन पुढे हिरवंगार भुकी गाव ओलांडून आम्ही तेल कॅम्पला पोहचलो.

तेल कॅम्प – (८००० फुट)
पाठीवर वजन घेऊन केलेला भुकी ते तेल कॅम्प हा ट्रेक पुढच्या प्रवासाचे ट्रेलर होता. सेट अप केलेल्या टेंट मध्ये सामान टाकले. सगळेच थकलेले होते.  परंतु पर्वतांमध्ये तुम्हाला जास्त काळ टिकायचं असेल तर तुम्हाला शरीराला सतत ऍक्टिव्ह ठेवावं लागतं. इप्सित स्थळी पोहचल्या पोहचल्या पथारी टाकून झोपलं तर शरीर आजूबाजूच्या हवामानाशी नीट एकरूप (Acclamitize) होत नाही. तेल कॅम्प साधारण ८००० फूट उंचीवर आहे. इथे स्नो आणि आईस मध्ये घालावे लागणारे स्नो बूट,गेटर, क्रम्पोन कसे वापरायचे याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. आधी सगळं घालायला आम्हाला २०-२५ मिनिटं लागायची ,ते आता ३-४ मिनिटात जमायला लागले. जवळच असणाऱ्या टेकडीवर आम्हाला स्नो मध्ये चालण्याच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात एक पाऊल टाकले तर गुडघ्यापर्यंत पाय स्नो मध्ये आत जात होता. एक एक पाऊल उचलून टाकणं ही कसरत होती. ‘Enjoy the discomfort and learn from it’ हाच इथला नियम होता.

पुढे तेल कॅम्प ते गुज्जर हट हा या बेस कॅम्प ट्रेकचा दुसरा टप्पा असणार होता. त्याचा अंदाज यावा म्हणून या ट्रेकचा अर्धा रस्ता कापून आम्हाला परत तेल कॅम्पला परत आणण्यात आलं . पुढे करायच्या असलेल्या चढाईचे ट्रेलरच जणू. हा ट्रेक खूप मोठा आणि प्रचंड थकवणारा होता. ट्रेक करून माघारी तेल कॅम्पला येताना शेवटची चढाई चढून कॅम्पचे तंबू दिसले तेव्हा सर्वांच्या जिवात जीव आला. गुज्जर हटचा ट्रेक तर यापेक्षा दुप्पट मोठा आणि जास्त उंची गाठणारा असणार होता. आजच्या पेक्षाही गुज्जर हट अवघड आहे या कल्पनेने सर्वांच्याच मनात धास्ती बसली होती. अनेक जण पुढे  आपल्याला जमेल की नाही या शंकेने घळपटले होते. काही जण शरीराने तर काही मनाने injured झाले होते. पर्वतांमध्ये स्वतःची अतिशय काळजी घ्यावी लागते. मागील दहा दिवसात कोणाचा अँकल ट्विस्ट झाला होता, कोणाचे खांदे वजन घेऊन चालण्याचा सराव नसल्याने दुखत होते, कोणाला गुडघ्यांचा त्रास होत होता तर कोणाला डोकेदुखी सतावत होती. शारीरिक दुखापतींसोबत काही जणांची खचलेली मने ही सुद्धा एक अडचण जाणवत होती. वर बेस कॅम्पला गेल्यावर काही त्रास झाल्यास खाली येण्याचा प्रवास ३ दिवसांचा होता. त्यामुळे Prevention is better than cure या न्यायाने आमच्या पैकी ५ जणांनी तेल कॅम्प वरूनच माघारी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वांनीच हे अतिशय जड अंतःकरणाने स्वीकारले. 

गुज्जर हट -(११३०० फुट )

कालच्या प्रॅक्टिस ट्रेक दरम्यान वेगाने चालणारे आणि हळू चालणारे असे दोन गट आपोआप निर्माण झाले होते. या हळू चालणाऱ्या गटाने सकाळी इतरांपेक्षा थोडे लवकर चालायला सुरुवात करावी म्हणजे ते गुज्जर हटला सर्वांसोबत पोहचतील असे ठरले. गुज्जर हट हे ११३०० फूट उंचीवर असलेले मुख्य बेस कॅम्पच्या अलीकडे असलेलं एक ठिकाण. साधारण ३३०० फुटांची उंची आम्हाला एका दिवसात गाठायची होती. वाटेत पूर्ण स्नो होता. एक पाऊल टाकल्यावर गुडघ्यापर्यंत पाय कधीकधी स्नो मध्ये जायचा. तो पूर्ण बाहेर काढून पुढचं पाऊल टाकायचं. एक एक पाऊल टाकणं इथं कसरतीचं काम होतं. एका ठिकाणी चालत असताना माझ्याच एका चुकीमुळे तोल जाऊन मी मुख्य वाटेच्या बाजूला असलेल्या स्नोच्या उताराकडे माझे पाऊल पडले. पाठीवरील २५ किलो वजनाच्या रकसॅकसहित मी स्नो मध्ये अडकलो. पाऊल टाकल्यावर माझा पाय खाली गेला तोच थेट कंबरेपर्यंत. थोडी हालचाल केली तरी मी अजूनच आत जात होतो. काही करता मला बाहेर येता येईना. शेवटी आमच्या प्रशिक्षकांपैकी एकाने माझ्यासाठी मागे येऊन दुरूनच मला हात देऊन ओढून बाहेर काढलं. पाठीवर ओझे घेऊन मध्ये मजल दरमजल करत ‘कधी येणारच नाही’ असं वाटणाऱ्या गुज्जर हट ला ४ वाजता आम्ही एकदाचे पोहचलो. दहा तास आम्ही पूर्ण चढाईचा रस्ता चालत होतो. आपण हे सगळं कशासाठी करतोय, यातून काय मिळणार आहे, असे बेसिक प्रश्न पावला पावलागणिक पडत होते. परंतु गुज्जर हटला पोहचल्यावर समोरचा नजारा पाहून सगळा थकवा क्षणभर पळाला. पर्वतांमध्ये संध्याकाळी ४ ते ६ ही वेळ अतिशय नयनरम्य असते. आम्ही गुज्जर हटला पोहचलो तेव्हा दूरवर दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र माउंट जॉनली या पर्वतावर आणि पूर्ण दिनगाढ व्हॅलीत केशरी संधीप्रकाश पसरलेला होता. वातावरणात हवाहवासा गारवा होता. दिन गाड (गाड म्हणजे नदी) खळखळ करत बाजूने वाहत होती. हे दृश्य पाहून ‘याजसाठी केला होता सारा अट्टाहास’ अशी भावना झाली. पण संध्याकाळ रात्रीकडे झुकली तसं या हव्या हव्याश्या गारव्याचं नको नकोश्या थंडीत रूपांतर झालं. जेवण झाल्यावर पर्वतांमध्ये राहताना घ्यायच्या काळजीच्या काही महत्वाच्या सूचना आम्हाला केल्या गेल्या. उदाहरणार्थ आमच्या सर्वांकडे लोखंडी आईस एक्स होत्या. सकाळी ग्लोव्हस न घालता रात्रभर थंड पडलेल्या आईस एक्स ला स्पर्श केल्यास धातू दंश (Metal Bite) होऊन ती तशीच त्वचेला चिटकून बसते आणि निघणे फार अवघड असते. किंवा दिवसा डोळ्यांवर डार्क गॉगल न घालता उघड्या डोळ्यांनी स्नो कडे पाहिले तर तीव्र सूर्यकिरणे पांढऱ्या स्नो वरून परावर्तित होऊन थेट डोळ्यात जाऊन स्नो ब्लाइंडनेस येऊ शकतो. या आजारात डोळे भयंकर चुरचुर करतात. या स्नो ब्लाइंडनेस वरचा उपचार म्हणजे १० ते १५ दिवस अंधाऱ्या खोलीत बसणे. अशा पर्वतांमधल्या खूप छोट्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी आम्हाला पावलो पावली समजत होत्या.  बर्फावर झोपण्याची आम्हा सर्वांची पहिलीच वेळ होती. रात्री जेवण करून टेंटमध्ये  खाली अंथरलेल्या ताडपत्रिवर स्लीपिंग मॅट अंथरून आम्ही झोपलो. पर्वतांमध्ये कधीच गाढ झोप लागत नाही. झोप तुकड्या तुकड्यांमध्येच लागते. गुज्जर हटला केलेल्या मुक्कामाचं वैशिष्ट्ये असं  की आम्ही इतके जास्त थकलेल्या धुंद अवस्थेत होतो की त्या रात्रीचं आम्हा कोणालाच फारसं काही आठवत नाही.  आम्ही तिथे पोहचलो होतो आणि तिथं मुक्काम केला होता इतकंच खरं.

बेस कॅम्प -(१२३०० फुट )

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गुज्जर हट हुन बेस कॅम्पच्या दिशेने निघालो. 3 तासांचे अंतर कापून दिन गाढ व्हॅली मधील माउंट जॉनली आणि माउंट द्रोपदी का दांडा या पर्वतांच्या तळापाशी 12300 फुट उंचीवर वसलेल्या निम बेस कॅम्पला आम्ही पोहचलो. बेस कॅम्प म्हणजे छोटे टुमदार गावच. तिथं गेल्या गेल्या थेरीमध्ये शिकवल्याप्रमाणे आम्ही टेंट लावले आणि गावातली आमची घरं उभी राहिली. बेस कॅम्पला एक ग्रंथालय सुदधा होतं. पुढील १० दिवस स्नो क्राफ्ट आणि आईस क्राफ्ट शिकण्यासाठी आम्ही इथे असणार होतो.

डोकरानी बामक – ग्लेशियर (१३००० फुट )

बामक किंवा ग्लेशियर म्हणजे बर्फाची हळूहळू पुढे सरकणारी हिमनदी. पुढील सर्व दिवस आम्ही दिनगाढ व्हॅलीतल्या मोरेन (morain) मधील डोकरानी बामक ग्लेशियर पर्यंतचा ७ किलोमीटरचा ट्रेक करत होतो. ते १३००० फूट उंचीवर होते. या ग्लेशियरच्या स्नो आउट झोन मध्ये आम्ही आईस क्राफ्ट शिकलो. बर्फावर चढण्यासाठी आमच्या कडे क्रॅम्पोन होते जे स्नो बूट वर चढवून बर्फावर चढाई करायची होती. पायात ३-३ किलो वजनाचे बूट घालून बर्फावर चढाई करणं हे अतिशय तंत्रआधारित आणि कौशल्याचे काम होते. स्नो क्राफ्ट प्रशिक्षणात, स्नो मध्ये जर तुम्ही कोसळला आणि उतारावरून घरंगळत खाली येत असाल तर स्वतःला कसे रोखायचे याची तंत्रे शिकवली गेली. खडकांवर तुम्हाला सगळ्यात वर शेवटी दोर अँकर करायला झाड, मोठी शिळा , दगड असे काहीतरी सापडू शकते. इथे चहू बाजूला फक्त भुसभुशीत स्नो किंवा कडक बर्फ….या स्नो आणि बर्फात नैसर्गिक आणि आर्टिफिशिययल अँकर कसे करायचे हे शिकवले गेले.  क्रिव्हास (हिमदरी) क्रॉसिंग शिकवले गेले. आमच्या बरोबर इथे सर्च आणि रेस्क्यूचे ऍडव्हान्स प्रशिक्षणही सुरू होते. त्यामुळे हेलिकॉप्टर रेस्क्यू आम्हाला शिकायला मिळाला. त्यासाठी खास दिल्लीहून हवाई दलाचे हेलिकॉप्टर बेस कॅम्प वर आले होते. ते येण्याआधी काय तयारी करायची, स्नो मध्ये हेलिपॅड कसा बनवायचा, खालून पायलटशी हातवाऱ्याद्वारे संवाद कसा साधायचा याचे प्रात्यक्षिक आम्हाला मिळाले. सर्च आणि रेस्क्यू कोर्समध्ये इगलू बनवून त्यात दोन दिवस राहणे असाही एक भाग होता. त्यांनी बनवलेली इगलू ,हिमघरे, हिमगुहा आम्हाला बघायला मिळाली.

बिनभिंतींची उघडी शाळा

दिवसभर तांत्रिक कौशल्ये शिकून संध्याकाळी बेस कॅम्पवर पर्वतांमधील धोके, अति उंचीवरील आजार, ग्लेशिअर, पर्वतांची परिभाषा, हिमप्रपात या विषयांचे थेरी वर्ग असायचे. इथले थेरी वर्गही दगड धोंड्यांवर किंवा स्नो वरच भरायचे. या वर्गांमध्ये गिर्यारोहणातले अतिशय प्रॅक्टिकल आणि गरजेचे ज्ञान आम्हाला दिले जायचे.
अति उंचीवर कमी ऑक्सिजन मुळे काही जणांना अति उंचीवरील आजारांचा (High Altitude Sickness) चा त्रास होतो.आमच्यातीलही ३ जण अतिउंचीवर होणाऱ्या त्रासामुळे बेस कॅम्पवरून माघारी परतले. काही अतिउंचीवरील आजारांमुळे भास आणि भ्रमही होतात. बाजूचा माणूस राक्षसासारखा अक्राळ विक्राळ दिसायला लागला , आजूबाजूची माणसं गाढवासारखी दिसायला लागली अशी उदाहरणे आहेत. पूर्वी एका विद्यार्थ्यांने बेस कॅम्पच्या भटारखान्यात येऊन कोणाच्या लग्नाची तयारी सुरू आहे? असं विचारल्याचं गमतीशीर उदाहरण एका प्रशिक्षकाने आम्हाला सांगितलं. त्याला थेट खाली न्यायला लागलं. या आजाराला High Altitude Cerebral Odema असं शास्त्रीय नाव आहे. यात व्यक्तीचं वास्तवाचं भान हरपतं. हा अतिउंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा अतिशय गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. अशा व्यक्तीला तात्काळ खाली आणणे हा एकमेव या आजारावरचा रामबाण इलाज असतो. कमी उंचीला आले की हा आजार आपोआप बरा होतो. गिर्यारोहण हे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण झालेले शास्त्र आहे.

निम बेस कॅम्पला इतक्या उंचीवर अतिशय नियोजनबद्ध पणे मिळणारे जेवण ,नाश्ता ही खरोखर उपलब्धी होती. आपापली भांडी आपण धुवायची हा नियम होता. इतक्या थंडीत बर्फाच्या पाण्यात भांडी धुताना सर्वांचीच भंबेरी उडायची. थकण्यात , स्वतःशी संघर्ष करण्यातही आनंद असतो हा दृष्टिकोन या प्रशिक्षणा दरम्यान आम्हाला मिळाला. हे प्रशिक्षण म्हणजे खऱ्या अर्थाने बिनभिंतींची उघडी शाळा होते. 

परतीचा प्रवास

भारताचा तिरंगा आणि भारतीयांच्या जगण्याचा महत्वाचा भाग असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेसोबत फोटो काढून १० दिवसांच्या कठोर अति उंचीवरील प्रशिक्षणानंतर आम्ही बेस कॅम्प सोडला. बेस कॅम्प ते गुज्जर हट, गुज्जर हट ते तेल कॅम्प, तेल कॅम्प ते भुक्की आणि भुक्की ते उत्तरकाशी असा दोन दिवस परतीचा प्रवास करून आम्ही नेहरू इंस्टिट्यूटला पोहचलो.  

पदवी समारंभ
१०  दिवसांनंतर आमच्या फोनला रेंज आली होती. फोनला रेंज येणे,आपल्याला घ्यायला बस येणे, बॅग चक्क बसच्या टपावर टाकता येते याचे आश्चर्य वाटावे इतके आम्ही पर्वतांशी एकरूप झालो होतो. परत आल्यावरही एक दिवस अस्सी गंगा नदीवर आम्हाला दोराच्या साहाय्याने आणि प्रत्यक्ष पाण्यातून चालत या दोन्ही प्रकारांनी प्रचंड वेगाने वाहती नदी क्रॉस करण्याची तंत्रे प्रात्यक्षिकांसहित शिकवली गेली .

प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी भारतातील महत्वाच्या आणि जेष्ठ गिर्यारोहक तसेच इंडियन माउंटनियरिंग फौंडेशनच्या अध्यक्ष असणाऱ्या, हर्षवती बिष्ट यांच्या हस्ते मानाची समजली जाणारी आईस एक्सची प्रतिकृती (Badge of Honour) समारंभपूर्वक आमच्या खिशावर लावण्यात आली. महाराष्ट्रातील जेष्ठ आणि महत्वाच्या गिर्यारोहक उषाप्रभा पागे आणि उमेश झिरपे हे पुण्याहून या समारंभासाठी आले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. प्रशिक्षण पूर्ण न करता आल्यामुळे त्याक्षणी सोबत नसलेल्या सहप्रवासी मित्रांची आठवणही मनाच्या एका कोपऱ्यात येत होती.

या प्रशिक्षणा दरम्यान मला भावलेल्या आणि जाणवलेल्या काही गोष्टी पुढे ठेवतोय.

Buddy पद्धत

या कोर्स मध्ये दोन दोन जणांच्या जोड्या करून Buddy नेमले जातात. एकमेकांचे Buddy असणाऱ्या दोघांनी एकमेकांची विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. आपल्या Buddy ने व्यवस्थित खाल्ले की नाही, सर्व गटासोबत तो आहे की नाही, तो बरा आहे की नाही यावर लक्ष ठेवायचे असते. पर्वतांमध्ये शु करण्यासाठी टेंटच्या थोडं दूर जायला लागतं. टेंटच्या जवळपास केली तर त्याचा वास म्हणजे वन्य प्राण्यांना ‘आम्ही इथे आहोत’ असं दिलेलं आमंत्रणच असतं. त्यामुळे रात्री उणे तापमानात टेंट पासून दूर आपल्या Buddy सोबत जाणे ही सुद्धा Buddy ची जवाबदारी असते. पर्वतांमध्ये कोणत्याही कारणाने रात्री किंवा शक्यतो दिवसाही कोणी एकटं फिरू नये हा नियम आहे. एकतर उन्हामुळे दिवसभरात जमिनीवर साचलेल्या पाण्याचा कडक रात्री बर्फ होतो. त्याला Verglass असं म्हणतात. पायात घातलेल्या 2 -2 कीलो वजनाच्या स्नो शूज सहित आजूबाजूला उणे तापमान आणि भणान वारा असताना हमखास आपण त्यावरून घसरून आपटतोच. Disorientation होऊन माणूस भरकटूही शकतो. अशावेळी एकाला दोघे बरे या न्यायाने Buddy पद्धत अस्तित्वात आली. पूर्वी एका बॅच मधला एक जण रात्री बाहेर पडल्यावर न दिसल्याने हिमदरीत (Crevasse) खोल खाली गेला. केवळ सोबत Buddy असल्याने त्याने येऊन सर्वाना सांगितले आणि त्याचा अतिशय अवघड असा रेस्क्यू करावा लागला होता. सहजीवनाच्या संकल्पनेशी साधर्म्य असणारी ही Buddy पद्धत पर्वतांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर खुप उपयोगी पडते.

नाटक आणि गिर्यारोहण

नाटक आणि गिर्यारोहण यात असणारे अनेक साधर्म्य मला या प्रशिक्षणा दरम्यान जाणवली. या दोन्ही कला गटाने साकार करण्याच्या कला आहेत. दोन्हीकडे चुकीला माफी नाही. गिर्यारोहणात झालेली चूक तुमच्या जीवावर उठू शकते. नाटकात वाक्य विसरलेल्या नटाचीही भावना क्षणभर ‘मरण परवडले’ अशीच होते. दोन्ही ठिकाणी फार फार तर तुम्ही झालेली चूक सावरू शकता. एकटा माणूस नाटक करू शकत नाही आणि गिर्यारोहणही.  गिर्यारोहणात ग्लेशियर वर चालताना पाच जण एकमेकांना दोराने जोडून घेतात आणि एका रांगेत चालतात. एखादा जण पडला आणि खाली दरीत घसरत चालला तर त्याने ‘I am Falling ‘ असे ओरडायचे असते आणि त्याच्याच दोराला जोडलेले इतर जण पोटावर पडून आईस एक्सचे दात स्नो मध्ये रुतवून त्याचा फॉल रोखतात. नाटकातही एकाने केलेली चूक इतरांनाच सावरून घ्यावी लागते. गिर्यारोहणात क्लायंबर आणि बिलेयर अशी जोडी असते. क्लायंबर दोराच्या साहाय्याने चढाई करतो आणि चढताना तो पडला तर बिलेयर तांत्रिक उपकरणे आणि कौशल्याच्या साहाय्याने त्याचा फॉल रोखतो. त्यासाठी गिर्यारोहक प्रचंड सराव करतात. ‘रियाज करोगे तो राज करोगे’ हा नाटकातला नियम इथेही लागू होतो. कधी कधी प्रचंड वारा, वळणा वळणांचा असणारा क्लाइम्ब रूट यामुळे क्लायंबर आणि बिलेयर यांना एकमेकांचा आवाज येत नाही , ते एकमेकांना दिसतही नाहीत. पण दोराने ते एकमेकांशी जोडलेले असतात. तेव्हा केवळ दोराच्या हालचाली वरून ‘ या हृदयीचे त्या हृदयी’  संवाद होतो आणि त्यानुसार क्लाइम्ब होते. नाटकांचे दौरे आखणी आणि गिर्यारोहणाची मोहीम आखणी यातही अनेक साम्यस्थळे आहेत. नाटकासारखेच गिर्यारोहणातही एकीकडे फक्त लोकप्रियता आणि पैसे यांची हमी देणारी शिखरे चढणारे व्यावसायिक गिर्यारोहक आहेत तर दुसरीकडे मोहिमांसाठी स्वतः आणि लोकवर्गणीतून पैसे उभे करून अनवट वाटा धुंडाळणारे , जोखीम उचलणारे प्रयोगशील गिर्यारोहकही आहेत.

दोन्हीतही मोठा दमसास लागतो. नाटक आणि गिर्यारोहण दोन्हीमध्ये अलर्टनेस अतिशय महत्वाचा. नटाला जसं स्वतःची भूमिका साकारण्यासोबत प्रकाश, ध्वनी आणि रंगमंचावर घडणाऱ्या इतर गोष्टींविषयी अलर्ट राहायला लागतं तसं गिर्यारोहकालाही स्वतःच्या चढाई सोबत इतर सर्व बाबतीत प्रत्येक क्षणाला अलर्ट राहायला लागतं. एखाद्या वेळेस प्रयोग जसा फसतो तसं क्लाइम्बही फसू शकतं. प्रयोग तुम्ही पुन्हा करू शकता तसं एखाद्या वेळी फसलेली मोहीम तुम्ही पुन्हा आखू शकता. नाटक आणि गिर्यारोहण यात अनेक साम्यस्थळं सापडल्याने माझा या प्रशिक्षणाचा प्रवास अधिक आनंददायी झाला. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात कॅम्प फायर दरम्यान एक छोटे नाट्य सादरीकरण करण्याचीही संधी मिळाली. चहूबाजूना हिमालयीन पर्वतांनी वेढलेल्या निसर्ग मंचावर सादरीकरण म्हणजे ‘सोने पे सुहागा’ होता.

साहस आणि जोखीम

गिर्यारोहणात साहस आणि जोखीम आहेच. योग्य वेळी माघारी येण्याचा कटू निर्णयही घेता यायला हवा. तो अनेकांना घेता येत नाही आणि त्याचे पर्यवसान दुर्घटनांमध्ये होते.पर्वतांमध्ये घडणाऱ्या दुर्घटनांपैकी अनेक दुर्घटना गिर्यारोहणाकांच्या चुकीच्या निर्णयांमुळे सुद्धा झालेल्या आहेत. माउंट एव्हरेस्ट या अगदी जगातील सर्वोच्च शिखराच्या समीट कॅम्पवर असताना खराब हवामानामुळे एक मुक्काम वाढवावा लागला.
गिरिप्रेमीचे आणि या मोहिमेचे लीडर उमेश झिरपे (मामा) यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे समीट न करता शिखराच्या अगदी जवळून स्वतः खाली येण्याचा निर्णय घेतला आणि इतर साथीदारांना वर पाठवले. शिखरावर पोहचणारा जितका जिगरबाज असतो तितकाच किंवा त्यापेक्षा काकणभर जास्त जिगर शिखराच्या अगदी जवळून खाली येण्याचा निर्णय घेण्यासाठी लागते. चढाई करणं जसं महत्वाचं तसं पर्वतांनी इशारा दिल्यावर मागे वळणंही महत्वाचं. पर्वतांकडे तुम्ही परत काही दिवस अथवा महिन्यांनी जाऊ शकता. पर्वत तिथेच उभे असतात.

मी काय शिकलो

या प्रशिक्षणाने मला चालत राहायला शिकवले. थका, दमा,पसाभर विश्रांती घ्या, पण आपले ओझे आपल्याच खांद्यावर टाकून चालत रहा हा इतर वेळी जगण्याला लागू होणारा नियम इथेही तसाच. या प्रशिक्षणाने भीतीवर मात करायला शिकवले. हे प्रशिक्षण म्हणजे ‘आपल्याला हे जमणारच नाही’ पासून ‘ अरेच्चा, जमतंय की ‘ पर्यंत आणि पुढे ‘मी करू शकतो’ पर्यंतचा प्रवास होता. या प्रशिक्षणाने मित्रांवर विश्वास ठेवायला शिकवले. मी पडलो तर बिलेयर माझा फॉल रोखणार आहे हा विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही क्लाइम्ब करू शकत नाही. गिर्यारोहणात शारीरिक तंदुरुस्ती जितकी महत्वाची तितकाच महत्वाचा मनाचा कणखरपणा. शरीर आणि मन यांची एकमेकांशी सांगड घालत , एक थकलं तर दुसऱ्याने त्याला उभारी देत पुढे जायला या प्रशिक्षणाने शिकवले. यात आम्हाला जीव तोडून शिकवलेल्या निम आणि गिरिप्रेमीच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा होता.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावरही आमचे प्रशिक्षक कृष्णा ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सह्याद्रीतील तैलबैला आणि सांगणोरे या दोन सुळक्यांवर चढाई करण्याच्या मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वीही केल्या.

जगताना आनंद  मिळवण्यासाठीचे गिर्यारोहण हे आणखी एक साधन मला या प्रशिक्षणादरम्यान सापडले.
बघू ..यात अजून काय काय जमतंय ! !
सपने तो बहोत है ! !

– कृतार्थ शेवगावकर

गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे गिर्यारोहणाचे अनेक प्रशिक्षणे, उपक्रम मुलांसाठी, युवकांसाठी आणि सर्वांसाठीच सुरू असतात. दर गुरुवारी गिरिप्रेमी क्लबची मिटिंगही असते. त्याची माहिती मिळवण्यासाठी खाली संपर्क क्रमांक देत आहे.
विवेक शिवदे (गिरिप्रेमी) – संपर्क : +919769302934)

GGIM